भंडारा : वीरगाथा 4.0 या प्रतिष्ठित स्पर्धेच्या जिल्हा स्तरीय फेरीत पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, पाचगाव च्या विद्यार्थ्यानी यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या स्पर्धेत पाच गटांपैकी चार गटांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या शौर्याची माहिती आणि या शूर वीरांच्या जीवनगाथा विद्यार्थ्यांमध्ये पोहोचविण्याच्या उद्देशाने २०२१ मध्ये शौर्य पुरस्कार पोर्टल (GAP) अंतर्गत प्रकल्प वीर गाथा सुरू करण्यात आला आहे, जेणेकरून देशभक्तीची भावना जागृत होईल आणि त्यांच्यात नागरी जाणिवेची मूल्ये रुजतील. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांद्वारा या शौर्य पुरस्कार विजेत्यांवर कला, कविता, निबंध, मल्टिमीडिया अशा विविध माध्यमांतून वेगवेगळे प्रकल्प तयार केले जातात आणि संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयातर्फे राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट प्रकल्पांना गौरविण्यात येते. यावर्षी जिल्हास्तरीय विरगाथा स्पर्धेत जवाहर नवोदय विद्यालय, पाचगाव च्या गायत्री रामटेके (12 वी विज्ञान), यथार्थ वासनिक (10 वी), सृजल जांभुळकर (10 वी) आणि निष्कर्षा रामटेके (8 वी) यांनी आपल्या गटांत स्थान मिळवत विद्यालयाचा झेंडा उंचावला.
यातील यथार्थ वासनिक याने राज्यस्तरीय फेरीतही यश मिळवून राष्ट्रीय स्तरावर आपली निवड निश्चित केली आहे. यथार्थ च्या या उज्ज्वल कामगिरीमुळे त्याला 26 जानेवारी 2025 रोजी दिल्लीतील कर्तव्य पथावरील गणराज्य दिनाच्या परेडमध्ये सहभागी होण्याचा सन्मान मिळाला आहे. या यशाबद्दल शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालक वर्गातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विद्यालयाच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे संपूर्ण जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.